लिडकॉम मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यात चर्मकार प्रवर्गातील युवक – युवतींना आणि महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे 3 वर्षात 25 हजार चर्मकारांना प्रशिक्षण मिळेल. या करारावर लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक श्री.धम्मज्योती गजभिये आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे केंद्र प्रमुख तथा राज्य समन्वयक श्री. हेमंत वाघमारे यांनी स्वाक्षरी केली.
या प्रशिक्षणात चर्मकार उद्योगातील व्यवसाय योजना, वित्त व्यवस्थापन,उत्पादन प्रक्रिया, विपणन आणि ग्राहक सेवा यासह विविध विषयांचा समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षितांना महामंडळाच्या योजना आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
या करारामुळे चर्मकार प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक- युवतींना आणि महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल. या कराराच्या वेळी लिडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक श्री.धम्मज्योती गजभिये यांनी माननीय मुख्यमंत्री,माननीय उपमुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांचे आभार व्यक्त केले. चर्मकार प्रवर्गातील युवक-युवतींनी आणि महिलांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.गजभिये यांनी केले आहे.
या कराराच्या वेळी लिडकॉमचे व्यवस्थापक श्रीमती स्नेहलता नरवाने,सहव्यवस्थापक श्री.एन.एम.पवार,कंपनी सेक्रेटरी श्री. प्रदीप रथ,आणि प्रशासकीय अधिकारी सौ.संगीता पराते उपस्थित होते. एमसीईडी मार्फत राज्य समन्वयक श्री हेमंत वाघमारे व श्री युवराज इंगोले उपस्थित होते.
संपर्क जिल्हा उद्योग केंद्र द्वारा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धाराशिव जिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रशांत मते यांच्याशी संपर्क साधावा.